*कथा ...राजकुमारी लोपामुद्रा
सकाळची प्रसन्न वेळ. राजकुमारी लोपामुद्रा राजमहालात आली. महाराणींना वंदन केलं, महाराजांना वंदन केलं, आणि ती परत जाऊ लागली. तिच्या त्या सार्या मोहक हालचाली दोघंही कौतुकाने पाहत होते. पाहून सुखावत होते. ती जाताच महाराणी म्हणाल्या, "आपली लोपामुद्रा आता मोठी झाली."
"हं !"
"हं काय ! महामंत्र्यांना बोलावून घ्यावं म्हणते. आजच !"
"ते कशाला ?"
"कमाल आहे बाई तुमची राज्याच्या कामात घरच्या कामाकडे अगदी लक्ष नसतं तुमचं ! महामंत्र्यांना सांगून लोपामुद्रेसाठी एखादा सुरेख राजकुमार शोधायला हवा."
महाराज खळखळून हसत म्हणाले, "खरं आहे. हे माझ्या लक्षातच आलं नव्हत्म हं !" आणि पुन्हा ते विचारात बुडून गेले. त्यांनाही जाणवलं--कन्येसाठी, तिच्या रुपागुणाला साजेसा वर शोधायलाच हवा. मनातल्या मनात ते एकेका देशाचे युवराज आठवू लागले; पण प्रत्येकात काही ना काही उणिवा जाणवू लागल्या. लोपामुद्रेच्या दर्जाचा एकही राजकुमार त्यांच्या नजरेसमोर येईना.
"कसला एवढा विचार चाललाय ?"
"छान, तुम्हीच विचार करायला लावून, परत आम्हालाच विचारताय. कमाल आहे बुवा !"
"म्हणजे ?"
"लोपमुद्रेच्या विवाहाचा विषय आपणच नाही का काढला ?"
"पटलं ना आमचं म्हणणं ? आता आमची काळजी दूर झाली. पण आपल्या मुद्रेला साजेसा वर हवा हं ! नवसासाया्साची एकुलती एक आपली मुलगी. वेळ लागला तरी चालेल; पण रुपागुणांनी संपन्न आणि तिला जपणारा हवा. अगदी फुलासारखं !"
"अहो, अजून वरसंशोधनाला सुरुवातही नाही. तोच--"
"आधीच सांगितलेलं बरं ! नंतर यादी वाचून काय उपयोग ?"
महाराज पुढे काही सांगणार तोच दूत पुढे झाला. प्रणाम करीत सांगू लागला,
"क्षमा असावी महाराज, आपल्या एकांताचा भंग करावा लागला. पण महत्त्वाची वार्ता आहे."
"कोणती ?"
"थोर तपस्वी अगस्त्यमुनी आपल्या भेटीसाठी राजवाडयाकडे येत आहेत."
"शुभ शकुनच म्हणायचा ! लोपामुद्रेच्या विवाहाचा आपण विचार करीत असतानाच, त्यांचं आगमन व्हावं. त्या पुण्यपुरुषाच्या चरणधूलीनं वास्तू पवित्र व्हावी हा योगायोगच नाही का ?" महाराणींची धांदल उडाली. त्या पुन्हा म्हणाल्या, "महाराज, आपण पुढं होऊन त्यांचं स्वागत करावं. आम्ही त्यांच्या पूजनाची, फलाहाराची तयारी करायला लागतो."
विदर्भाच्या राजमहालात एकच धावपळ उडाली. अगस्त्यमुनी आल्याची वार्ता वार्यासारखी पसरली. आपल्या हाती सापडेल ते पूजा साहित्य घेऊन जो तो त्यांच्या दर्शनाला येत होता, साष्टांग नमस्कार घालीत होता आणि आशीर्वाद घेऊन, कृतकृत्य होत होता; कृतार्थ होऊन परत फिरत होता. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अगस्त्यमुनी सर्वांना प्रसन्न अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. राजवाडयातल्या सर्वांनी दर्शन घेतले. महालातली गर्दी कमी झाली. मुनींची दृष्टी शोधक नजरेनं कुणाला तरी शोधत होती. त्यांनी राजाला विचारलं, "राजा, तुझी कन्या कुठं दिसत नाही ?"
"आमची ? मुनिराज, ती आपलीच कन्या आहे. आपल्याच आशीर्वादानं ती आम्हाला लाभली. आपणच तिचे जनक !"
"नाही राजा, मि तिचा जनक कसा असेन ! तिचे जनक आपणच आहात. खूप वर्षांपूर्वी काही एक हेतू मनात धरुन, ’तुम्हाला एक गुणसंपन्न कन्या होईल’ असा आशीर्वाद मी दिला होता."
"सांगावा हेतू. मुनिवर्य, आपली इच्छा म्हणजे आम्हाला आज्ञाच आहे. आम्ही ती लगेच पुरवू."
"वचन देतोस ?"
"विश्वास ठेवावा मुनिवरांनी ! आम्ही आमच्या शब्दाला प्राणापलीकडे जपतो. आमचा शब्द हेच वचन !"
"ठीक आहे. नाव काय म्हणालास तुझ्या कन्येचं ?"
"लोपामुद्रा--"
"आता उपवर झाली असेल ना ?"
"होय मुनिवर ! रुपागुणानं अद्वितीय असणार्या माझ्या मुलीला अनुरुप वर प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. तसा आपला आशीर्वाद असावा."
"तथास्तु."
एवढयात महाराणींच्या बरोबर लोपामुद्रा आत आली. एवढे मोठे जितेंद्रिय अगस्तिमुनी- पण तिच्या लावण्याकडे पाहतच राहिले. त्या सौंदर्याने डोळे दिपले त्यांचे. स्वतःला सावरुन प्रसन्नपणानं ते राजाला म्हणाले, "राजा, वरसंशोधनासाठी कुठंही हिंडायची गरज नाही तुला. तुझ्या पुण्याईनं वर घरी चालत येईल !"
"मी स्वतःला धन्य समजेन ! सारी आपली कृपा."
लोपामुद्रा पुढे झाली. अगस्तिमुनींचं नाव तिच्याच संदर्भात तिने खूप वेळा ऐकले होते. मुलाची कामना बाळगून
आईवडिलांनी व्रतवैकल्यं केली होती; तप केले होते, ते केवळ अगस्त्यमुनींच्या आशीर्वादानेच फलद्रूप झाले होते. प्रारंभापासूनच तिच्यावर त्यांची कृपा होती, हे तिला माहीत असल्याने त्यांच्याबद्दल तिला नितांत आदर वाटत आला होता; पण प्रत्यक्ष दर्शनमात्र आजच घडत होते. तिने अत्यंत नम्रतेने, आदराने आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवले. अगस्त्य रानावनात भटकणारे ! चालून चालून रुक्ष झालेले आणि थंडीवार्याने, मातीने भेगाळलेले त्यांचे पाय. त्या पायांना राजकन्येच्या मुलायम केशकलापांचा स्पर्श झाला, तिच्या कोमल कपाळाचा स्पर्श झाला आणि ऋषी सुखावले. तिच्या रेशमी केशकलाप असणार्या माथ्यावरुन हात फिरवीत ते म्हणाले, " राजा, माझ्या कल्पनेत असणार्या तुझ्या मुलीच्या प्रतिमेपेक्षाही ही सुंदर आहे."
"होय गुरुदेव ! आपलाच प्रसाद."
"प्रसाद नाही, राजा ! ही आमची ठेव आहे."
"ठेव ?"
"हो, ठेवच ! राजा, ही कन्या आम्ही आमच्यासाठी निर्माण केली. आमच्या तपाची पुण्याई त्यासाठी तुम्हा दोघांच्या पाठीशी उभी केली होती. आज आम्ही तिला न्यायला आलो आहोत."
"पण महाराज--तिचा विवाह--"
"आमच्याशी होईल. आज आम्ही आलोत ते तिला मागणी घालायला."
लोपामुद्रा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. मनात म्हणाली, ’या मुनींना आज झालंय तरी काय ? संन्याशाला शृंगाराची स्वप्नं पडावीत ? वठलेल्या वृक्षानं वेलीचं साहचर्य अपेक्षावं ? वैराग्याच्या मनी कामकळा निर्माण व्हावी ? छे.. भलतंच काही तरी ! यांना समजावणार तरी कोण ? अन् तसं घडलं नाही तर ? आपल्या सार्या स्वप्नांची राखरांगोळी--’ हा विचार मनात येताच ती गोंधळली. कावरीबावरी झाली. तिला काही सुचेनासं झालं.
महाराणींनी अगस्त्यांचे शब्द ऐकले नि सारे विश्वच आपल्या भोवती फिरते आहे, असं त्यांना वाटलं. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. आपल्या या नाजुक फुलाला हा असला रुक्ष, ओबडधोबड पती ? हा आपला जावई ? त्यांना ही कल्पनाच सहन होईना. आणि महाराज ! एवढे विवेकी, संयमी, पण या अकस्मात झालेल्या आघातानं बधिर झाले. चिंताक्रांत बनले.
’काय करावं ? या मुनींशी लोपामुद्रेचा विवाह म्हणजे पोटच्या पोरीचा बळी देण्यासारखंच आहे. हा दरिद्री ब्राह्मण-आहे काय याच्याजवळ ? पण नकार तरी कसा देणार ? याने शाप दिला तर ? राजवंश नाहीसा होईल. राज्यलक्ष्मी निघून जाईल. निरपराधी प्रजा भरडली जाईल. काय कराव्म ? बळी द्यायचा तो कोणाचा ? लेकीचा की प्रजेचा ?’
"राजा, विचार कसला करतोस ?"
"हाच, महाराज....माझी कन्या अजाण. तिला आपल्यासारख्या तपस्यांची सेवा कशी जमणार ? आपला संसार सुखी करणं..."
"केवळ लोपामुद्रेच्याच हाती आहे. याची मला कल्पना आहे, म्हणूनच राजा, मी येथे येण्याचे कष्ट घेतले."
"पण..."
"आता पुन्हा पण कसला ? आमचे पितर तिकडे झाडावर लोंबकळत राहिले आहेत. खाली डोकं वर पाय करुन. त्यांची त्या नरकातून सुटका करायची म्हणजे माझा विवाह झाला पाहिजे. मला पुत्र व्हायला पाहिजे. या हेतूनं, माझ्या वंशवृद्धीसाठीच मी तुला आशीर्वाद दिला होता. लोपामुद्रेसारख्या रत्नाला तुझ्या कुलात उत्पन्न केलं. तीच मला वधू म्हणून योग्य आहे. आज तिचं पाणिग्रहण करण्याच्या हेतूनेच मी इथं आलो आहे."
"तरीही मुनिवर, हा विवाह..."
"राजा, दिलेला शब्द एवढयात विसरलास ? तुझा शब्द म्हणजेच वचन ना ? मग ते पाळायला नको का ? दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळावा लागतो. राजा...."
अगस्त्यांचा आवाज वाढत होता. त्याची तीव्रता जाणवत होती. पुढे काय होणार याची ती नांदीच होती. लोपामुद्रेची आई दुःखाच्या खोल गर्तेत बुडून गेली होती. राजा दिलेल्या शब्दांत गुंतला होता. अगतिक झाला होता. यातून मार्ग काढणं केवळ लोपामुद्रेच्याच हाती होतं. तिने विचार केला, ’आईवडिलांना चिंतामुक्त करणं हे मुलीचं कर्तव्य आहे. आज ते माझ्या हाती आहे. माझ्या ऐहिक सुखाचा विचार करण्याची ही वेळ नाही. सुखस्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलण्याचीही ही वेळ नाही. राज्यदेखील आज शापाच्या तडाख्यात सापडेल. या सर्वांसाठी मला पुढे झाले पाहिजे. प्राक्तन अटळ असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. वनवासही सुखाचा केला पाहिजे; नव्हे,
लोपामुद्रेचे डोळे काही एका निश्चयाने चमकले. ती बदलली. पूर्ण बदलली, तिचा स्वप्नाळूपणा हरपला, अल्लडपणा संपला. ती गंभीर झाली. धीरानं पुढं झाली अन् सगळा संकोच सोडून म्हणाली,"मुनिवर्य, ही विदर्भकन्या लोपामुद्रा आपल्याशी विवाह करायला आनंदाने तयार आहे."
"पोरी ! काय बोलतेस तू हे ? शुद्धीवर आहेस का ?"
"आई, मी पूर्ण विचार केला आहे, हे असंच घडणार आहे. तात, माझ्या विवाहाची तयारी करायला सांगा."
तिचा तो निश्चय आणि चेहर्यावरचं ते तेज पाहून सारेच दिङमूढ झाले. तिला विरोध करायला कोणालाही शब्द सुचेनात. एवढंच काय पण सागराचं प्राशन करणारे, आतापी-वातापींचा ग्रास घेणारे आणि विंध्याद्रिलाही नमवणारे अगस्ती, पण त्या निश्चयाच्या तेजाने क्षणभर दिपून गेले. सुकुमार राज्यकन्येकडे पाहत राहिले.
अगस्ती आणि लोपामुद्रा यांचा विवाह झाला; पण सार्या राजप्रासादावर दुःखाची दाट छाया पसरली होती. कोणीच कोणाशी कारणाशिवाय बोलत नव्हतं. कामं यंत्रासारखी चालली होती. चैतन्यहीन ! सारे सोपस्कार आटोपले. लोपामुद्रा सासरी निघाली. वस्त्रालंकारांनी नटून !
अगस्तिऋषींच्या ही गोष्ट लक्षात आली. राजमहालाच्या दाराशीच ते थबकले. त्यांनी लोपामुद्रेला जाणीव दिली,
"लोपामुद्रे, तू आता ऋषिपत्नी झाली आहेस. ऋषिपत्नी ही स्वतःच लक्ष्मीरुप असते. तिला या चंचल लक्ष्मीची आवश्यकता नसते. आश्रमाभोवती असणार्या निसर्गाच्या सान्निध्यात रमताना, सेवाभावाचं आचरण करताना, तपस्या करताना या लक्ष्मीची अडगळ कशाला ?"
"खरं आहे, नाथ ! माझ्या लक्षातच आलं नाही हे. थांबावं आपण. मी आलेच आत्ता."
असं म्हणून ती माघारी फिरली--आपल्या उमलत्या वयाला न शोभणार्या गांभीर्यानं ! ती आपल्या महालात गेली. वस्त्रालंकारांनी
नटलेलं, सजलेलं आपलंच रुपडं एकदा डोळे भरुन पाहून घेतलं. आणि एकेक अलंकार उतरवायला सुरुवात केली. डोळ्यांत पाणी तरळलं, पण निश्चयानं तिनं ते पुसलं. वल्कलं परिधान केली. बाहेर आली. पतीशेजारी उभी राहिली, आणि नम्रतेनं हलकेच म्हणाली, "चलावं..."
महाराणी, तिच्या सख्या तिच्या या बदलाकडे अवाक होऊन पाहतच राहिल्या. सर्वांचा निरोप घेऊन ती निघाली. अगस्त्यांच्या पाठोपाठ. पतिसेवेचं कठोर व्रत आचरण्यासाठी ! वनातल्या पर्णकुटीकडे तिची पावलं पडत होती; आणि राजवाडयाच्या दारातून सारेजण अश्रूपूर्ण नेत्रांनी लोपामुद्रेच्या पाठमोर्या नि दूरदूर जाणार्या आकृतीकडे पाहत होते.
No comments:
Post a Comment