खरंच देव आहे का ???...
देव आहे! तर कसा आहे? सगुण साकार का निर्गुण निराकार??? ज्याची त्याची संकल्पना अनुभव भिन्न भिन्न असतात. तसाच माझाही...
आज विजाबाई सकाळी आमचे कार्यालयात आली ती कानाला मोबाईल लावूनच मोबाईलवर बोलता बोलता तिचे चेहऱ्यावर कधी भीतीचे कधी रागाचे कधी मदतीचे भाव दाट गर्दी करत होते. ती बराच वेळ फोनवर बोलत होती.विजबाई माझे कार्यालयातील मदतनीस सहकारी असल्यामुळे तिज्या धीर गंभीर चेहऱ्याकडे पाहिल्यावर आज मला थोडसं आश्चर्य वाटलं एव्हांना कणखर असणारी विजाबाई आज घाबरलेली चिंताक्रांत दिसत होती म्हणून मी सहजच तिला विचारलं! "काही अडचण आहे का "? तेव्हा कापरं भरल्या आवाजात मला बोलू लागली. " भाऊसाहेब माझी मावस बहीण मंदाची डिलिव्हरी आहे .तीला दवाखान्यात ऍडमिट केले आहे परंतु डॉक्टर म्हणताय तिची परिस्थिती खूप क्रिटिकल झाली आहे काय करू सुचत नाही आणि निशब्द झाली . परंतु लग्न झाल्यानंतर हनिमून गरोदरपणा प्रसुती हे निसर्गचक्र ठरलेले आहे . अशा अवस्थेत लग्न झालेल्या प्रत्येक बाईला मात्र एक लडिवाळ जीवाला जन्माला घालण्यासाठी स्वत:ला त्या जीवघेण्या अग्नि कुंडात झोकुन द्यावंच लागतं .त्यां न सोसणाऱ्या कळा जिरवाव्यात लागतात. असं बोलत असताना मी तिला धीर यावा म्हणून म्हटलं अरे! तु काही काळजी करू नको ,होईल सर्व काही व्यवस्थित परंतु तिच्या चेहऱ्यावर कमालीची भिती दिसून येत होती ती तिला सतत अस्वस्थ करत होती. आता तिची धावपळ सुरू झाली होती विजाने तिची जिथे जिथे ओळख आहे तिथे तिथे फोनाफोनी करून मदतीची याचना करत होती. आता मात्र मला राहावले नाही म्हणून मी तिला सविस्तर विचारले , नक्की काय झाले सांग? त्यावर तिने जे काही सांगितले त्यावर मीपण सुन्न होत गेलो. तिने सांगायला सुरुवात केली. भाऊसाहेब !!!' मंदा' ही आमची मावस बहीण आहे खूप शांत प्रेमळ गरीबगाय स्वभावाची मुलगी आहे तिचं पहिलं बाळंतपण आहे तिच्या नवऱ्याने तिला प्रसूतीसाठी सायन हॉस्पिटल ला अॅडमिट केले असून आज सकाळपासून तिला प्रसव वेदना सुरू झाल्या आहेत. पण त्या दरम्यान दरम्यान तिला खूप रक्तस्त्राव सुरू आहे तो काही केल्या थांबत नाही .आणि डॉक्टर म्हणतात आत्ता फक्त दोनच पॉईंट रक्त शिल्लक राहिलं आहे.तेव्हा डिलिव्हरी खूप क्रिटिकल आहे तुम्हाला दोन्हीपैकी एकाचीही खात्री देऊ शकत नाही. "शस्त्रक्रिये दरम्यान काही झाल्यास हॉस्पिटलला आम्ही जबाबदार धरणार नाही असं लिहून द्या".!! अशी अट ठेवली. त्यांचेही बरोबर आहे की अशा परिस्थितीत कोणीही हॉस्पिटलचा डॉक्टर रिस्क घेत नाहीत.आणि याहून सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे मंदाचा ब्लड ग्रुप "ए निगेटिव्ह" आहे. आत्ता हे ऐकून मी पुरता अवाकच झालो. कारण ए.बी.एबी ओ (रक्तदाता) या रक्तगटाचे अनेक लोक मिळून येतात. पण निगेटिव्ह रक्तगटाचे लोक मिळणं खूप कठीण असतं आणि निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीला फक्त निगेटिव्ह रक्तगटाचच रक्त लागतं त्यांना 'ओ'रक्तगट सुद्धा चालत नाही . आणि ते त्यातल्या त्यात वेळेला मिळणं तर खूपच मुश्कील असतं. आता मात्र तिची धावपळ पाहून मी पण माझा रवी नावाचा मित्र मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे मदतनीस म्हणून काम करत होता मी त्याला फोन लावून त्याबद्दल माहिती दिली योगायोगाने तोही त्याच गावाकडचा होता आणि त्याने सुद्धा मदत करण्याचं शब्द दिला.
अशा परिस्थितीत एक व्यक्ती मंदाचे चे सोबत राहून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून वैद्यकीय उपचार करत होती ती म्हणजे तिचा नातेवाईक असलेला व वयाची पन्नाशी पार केलेला असा एक निश्चल व्यक्ती तो म्हणजे "डॉक्टर श्रीहरी". होय डॉक्टर श्रीहरी!! विशेष म्हणजे ते स्वतः गायनोलॉजिस्ट (स्त्री रोग तज्ञ) होते. अनेक वर्ष त्यांनी या प्रकारच्या शस्त्रक्रियेत घालवून प्रसूती केल्या होत्या व अनेकांना जीवदान दिले होते अत्ता डॉक्टर श्रीहरीला बेतलेल्या परिस्थितीची अंधुकशी कल्पना आली आणि त्यानं विजाबाईला फोनवरून सांगितलं आपण फक्त प्रयत्न करू शकतो ! शेवटी तिचं आणि तिच्या पोटातल्या बाळाचं जगणं हे वेळ काळावर अवलंबून राहील. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांनी मंदाला मुंबईहून गावाकडे उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला.(कदाचित त्यांना पुढे घडणाऱ्या बिकट प्रसंगाची जाणीव झाली असावी व तशी तिथल्या सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुसटशी कल्पना दिली होती. जरी काही इपरीत घडले तरी गाव जवळ असावे म्हणून हा निर्णय घेतला असावा). या निर्णयाने सर्वच डॉक्टर अचंबित झाले कारण मुंबईसारख्या शहरात अत्यंत उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध असताना तिचे नातेवाईक तिला गावाकडे घेऊन जाणार. परंतु अशा परिस्थितीत क्षणभरही विचलित न होता तिच्या हालचालीवर त्रासावर प्रत्येक होणाऱ्या बदलावर लक्ष देऊन होता तो म्हणजे डॉक्टर श्रीहरी तोच आता तिच्या सोबत राहून शेवटच्या क्षणापर्यंत भगिरथी प्रयत्न करणार होता. तो त्या दोन जीवांना वाचवण्याची साठी प्रयत्नांची पराकाष्टा करून धडपडणार होता. आता मंदाचे सोबत तिचा पती ,डॉक्टर श्रीहरी ,एक पाहुणा नातेवाईक व चालक असा बीडच्या दिशेने गावाकडे ॲम्बुलन्स मधून प्रवास सुरू झाला. ॲम्बुलन्स वरचा दूत ड्रायव्हर दादा आता सारथ्य करत होता. अतिशय वाऱ्याच्या वेगाने जात होता तितकच पोटातलं पाणीही हालणार नाही याची काळजी घेऊन तो गाडी चालवत होता. परंतु प्रसव वेदनांनी व सततच्या रक्तस्त्रावाने बेजार झालेली निरागस मंदा निपचित पडून होती होती असह्य वेदना सहन करत होती. प्रवास सुरू होता. तोपर्यंत डॉक्टर श्रीहरीने व विजा एक मोठा सरकारी दवाखाना आंबेजोगाईला आहे त्या दवाखान्यात डीनला फोन करून मंदा पोहोचल्या बरोबर उपचार होईल अशी व्यवस्था करून घेतली होती. तिला ए निगेटिव्ह रक्त लागणार असल्याने त्याही रक्ताच्या दोन बॅग उपलब्ध करून ठेवल्या होत्या अवधी होता फक्त त्या ठिकाणी पोहोचण्याचा. पण मध्येच दुपारी विजा ने फोन करून डॉक्टर श्रीहरीला विचारलंं अरे कशी आहे परिस्थिती ? त्यावर त्यांने सांगितलं! शी इज नॉट कॉन्शीयस. (एक अडखळत श्वास घेणार शरीर ज्याच्या पोटात एक जन्माला येणार कोमल बाळ आहे. असं निपचित पडलेलं धड घेऊन जात होते ) तो सांगू लागला ती कधी मधी कॉन्सिअस होत आहे पण ब्लड मायनस मध्ये जात आहे. आणि तिला लावलेली ब्लड ची पिशवी संपली आहे. आता तिला रक्ताची खूप आवश्यकता आहे. जवळपास कुठे रक्तही भेटत नाही प्रवासात आहोत रोडवर कुठे शोधावं रक्त आम्ही ?. विजाबाई मात्र प्रवासातल्या आधी मध्ये येणाऱ्या गावात तिच्या नातेवाईकाकडे फोन करून रक्त मिळवण्यासाठी फोन करून टाहो फोडत होती. डॉक्टर श्रीहरी सुद्धा क्षणभर स्तब्ध झाले होते. त्यांनी लागलीच आपल्या चाणाक्ष बुद्धीने एक निर्णय घेतला त्यांच्यासोबत मदतीसाठी आलेले एक नातेवाईक होते त्यांचं ब्लड चेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांनी त्या नातेवाईकाचे ( देवदूताचे ) ब्लड चेक केलं योगायोग म्हणावा की! दैवी योगायोग ! म्हणावा ? त्या पाहुण्या रक्तदात्या रक्तदुतांचे रक्त ए निगेटिव्ह आले. ("विशेष म्हणजे त्या दुतानेआजपर्यंत कधीही रक्त चेक केलं नव्हतं ") मंदाच्या रक्तगटाशी मिळते जुळते मिळाले आता मात्र डॉक्टर श्रीहरीला पुन्हा विश्वास आला आणि त्यांनी त्या क्षणी त्याची रक्ताची एक पिशवी काढून तपासून क्षणाचाही न विचार करता मंदच्या शरीरात भरले . परंतु त्या परिस्थितीत चढउतार होत होता ते भरलेले रक्त पुन्हा कमी होऊ लागलं त्यानंतर दुसऱ्यांदा त्या रक्तदाताचे रक्त काढून पुन्हा भरलं प्रयत्नांती आता रक्त जाणं थोडं कमी झाले होते. पण आता डॉक्टर श्रीहरीला रक्तदात्यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे होतं त्यांच्याही तब्येतीतवर काही परिणाम होऊ नये यासाठी लक्ष द्यावे लागणार होतं पण त्याचवेळी तो रक्तदाता म्हणाला " डॉक्टर साहेब मी ठीक आहे आमची काळजी करू नका. भलं आमचं अजून रागात (रक्त) काढा पर यानां वाचवा, परयत्न करा "ही पोर आणि बाळ वाचलं पाहिजे " त्यांच्या या बोलण्याने आणि रक्त जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डॉक्टर श्रीहरी आता भलतेच इरेला पेटला होता. त्यांनाही प्रयत्नाला यश येईल असा विश्वास वाटु लागले होता. ॲम्बुलन्स चालवणाऱ्या दुताने आता बीड जवळ केलं होतं. तोपर्यंत विजाने आणि डॉक्टर श्रीहरीने हॉस्पिटलच्या डीन बरोबर फोन करून बोलून एका बेडची व्यवस्था करून प्रसूतीची तयारी करून ठेवली होती. त्यावेळी तेथे उपस्थित नातेवाईक असलेले समाज सेवक कदम सरांनी आणखी एका रक्तदूताला तयार करून ठेवले होते. अंबाजोगाईला पोहोचणं बाकी होतं तोपर्यंत आत्ता पुन्हा एकदा रक्तस्त्राव सुरू झाला आता मात्र पुन्हा एकदा रक्ताची आवश्यकता होती मग लगेच कदम सरांनी त्या रक्तदात्याला सोबत घेऊन ॲम्बुलन्स येणाऱ्या दिशेने कडे धाव घेऊन ॲम्बुलन्स जवळ केली त्याचे रक्त काढून ठेवलेली रक्ताचे पिशवीतील रक्त लगेच मंदाला देण्यात आले.त्या नंतर मंदाला आता त्या आंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू झाले. तोपर्यंत गावाकडील मंडळींनी हॉस्पिटलला गर्दी केली. अशा परिस्थितीत विजाचे समाजबांधव देखील मोठ्या प्रमाणावर एकवटून मदतीला धावत असतात हेही तितकच खरं आहे. त्यातच काही जुन्या खुळचट विचाराचे बायाबापड्ये म्हणू लागले " पोटचं बाळच मुळावर आलं पोरीच्या!. मी अशा मूर्ख अडाणी शिक्षीत अन् अशिक्षितानां म्हणेण अरे ज्या दोघांनी एकमेकांचा आनंद घेण्यासाठी चरमानंदाची सीमा गाठली असेल आणि त्यातून एक पवित्र आत्मा जन्म घेणार असेल तर त्याला दोष देणारे तुम्ही कोण? इरसाल अवलादी कुठचे!. अरे तिचा रक्तगट निगेटिव्ह आहे ते शरीर विज्ञान आहे ते त्या बाळाने थोडी ठरवले आहे. का विनाकारण त्या जगात न आलेला बाळाला दोष देता, कशासाठी देता. ही हलकट मानव जातीची रीतच म्हणा असो. आता तिला रक्ताची दुसरी बाटली भरली जात होती तिची डिलिव्हरी प्रसूती करण्याचा यक्षप्रश्न डॉक्टरांच्या समोर होता तिचे हिमोग्लोबिन रक्तातले प्रमाण बरोबर असणं आवश्यक होतं त्याबरोबर आता असह्य काळा यातना ,प्रवासाची दगदग यामुळे तिची प्रसूती साठी शारीरिक क्षमता राहिली नव्हती. अशावेळी व्हेंटिलेटर ची आवश्यकता भासणार होती पण त्यावेळी त्या दवाखान्यात खात्री केली असता व्हेंटिलेटरची मुबलक प्रमाणात उपलब्धी नव्हती आता हा वेगळाच प्रश्न आ वासून समोर उभा राहिला.? त्याचवेळी तिची स्थिती पुन्हा क्रिटिकल झाली आता डॉक्टर श्रीहरी सुध्दा तिच्या शरीराच्या कमजोर प्रतिसादापुढे हात टेकणार की काय ?अशी अवस्था होऊ गेली. मग धावपळ ,रडारड सुरू झाली नातेवाईकांची जमवा जमवी सुरू झाली जणू तिने शेवटचा श्वास घेतला की काय आणि तिचे पोस्टमार्टम करावे लागणार म्हणून की काय पोलिसांना बोलावण्याची मागणी आली आता सर्वांचे प्रयत्नाला खिळ बसणार अशी अवस्था झाली पण प्रयत्न सोडेल तो डॉ श्रीहरी कसला! मग पुन्हा एकदा मंदाला लातूरच्या दवाखान्यात प्रसूतीसाठी हलविण्याचा निर्णय घेतला , घ्यावा लागला धीर गंभीर वातावरणात जराही विचलित न होता डॉक्टर श्रीहरी मात्र त्यांच्या प्रत्येक निर्णयावर आपली वैद्यकीय कारवाई सुरूच ठेवून होता आता तो सुद्धा इरेला पेटला होता' हरणार नाही असा त्याने मनाला चंग बांधला होता' पुन्हा मंदाला ॲम्बुलन्समध्ये ठेवून लातूरच्या दिशेने रवाना झाले आता रात्रीचे जवळपास बारा वाजले होते लातूरला हॉस्पिटल ला पोहोचून तिच्यावर उपचार सुरू झाले डॉक्टर श्रीहरी बाजूलाच थांबून देखरेख करत होते आता रक्तस्त्राव थांबून हिमोग्लोबिनची पातळीत वाढ झाली होती नऊ पॉईंटच्या वरती गेलं होतो त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा डिलिव्हरी होईल असा विश्वास वाटू लागला होता परंतु तिची शारीरिक प्रतिकारशक्ती कितपत साथ देईल? हे आता त्या विधात्यालाच ठाऊक होते. पहाटे चार साडेचार झाले असतील तर डॉक्टर श्रीहरी व तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मंदाची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर श्रीहरीने अशा अनेक प्रकारच्या प्रसूत्या यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या त्याला स्वतःवरती विश्वास होता. आता तिचा सिजर करायचं की नॉर्मल डिलिव्हरी करायची हा प्रश्न होता परंतु नॉर्मल डिलिव्हरी करण्याची डॉक्टर श्रीहरीची हातखंडा होता त्याची हातोटी वाखगण्या जोगी होती. ब्रह्म मुहूर्ताच्या काळाला एकदम शांतता पसरली होती त्याचवेळी एक आवाज झाला. छोटासा हृदयाला स्पर्श करणारी किंकाळी ऐकू आली आता फक्त डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होते आणि डॉक्टर ही काही वेळातच बाहेर आले. लगबगीनं काही नातेवाईक पुढे आले डॉक्टरांना विचारते झाले काय झाले डॉक्टर ? त्यावेळी डॉक्टर श्रीहरी पुढे झाले आणि त्यांनी सांगितलं मंदाची डिलिव्हरी नॉर्मल झाली . असून तिला एक सुंदर कोमल अशी मुलगी झाली आहे दोघेही सुखरूप आहेत हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला!! सर्वांच्या जीवात जीव आला. कली काळावर मात करून दोन जीव आज सुखरूप झाले होते. *म्हणूनच म्हणतात ना "बाईपण भारी देवा".* मी आता विचार करू लागलो यमराज दरात उभा असताना कली काळाच्या जबड्यातून बाहेर पडणं कसं शक्य झालं? मग मात्र काही गोष्टी उलगडत गेल्या एक देव तारी त्याला कोण मारी ? देव प्रत्येक वेळी प्रत्येक अशक्य प्रसंगी वेळेवर मदत पाठवत राहिला. कोणाच्या ना कोणाच्या रूपातून, दुताच्या माध्यमातून जसं अखंड सोबत राहुन प्रसूती नॉर्मल करणारा डॉक्टर श्रीहरी हा देवदूत होता .मंदाला दवाखान्यात वेळेवर पोहोचवणारा ॲम्बुलन्स वाला दादा देवदूत होता. मध्येच कठीण प्रसंगी स्वतःचे रक्त देऊन जीवदान देणारा रक्तदाता पाव्हणा नातेवाईक देवदूत होता. तिच्यासाठी धावून येणारा प्रत्येकजण कोण होता ?त्याचं उत्तर " हो देवदूत होता".कारण देवानं पाठवलेला प्रत्येक जण हा "देवदूत" होता.
No comments:
Post a Comment