Wednesday, 1 October 2025

कथा.... " सूड "

कथा...."सूड"    


जुन्नर तालुक्यातलं 'मोहाळे,' हे छोटंसं गाव. हलक्याशा शिडकाव्याने, पावसाळा आगमनाची चाहूल देऊ लागला होता. झाडं न्हाऊन निघून, हिरवीगार झाली होती. आकाश कायम धुक्यानं झाकलेलं असे. गावाच्या टोकावर ते जुनं, कौलारू घर होतं.

ज्याला गावकरी 'बाहेरचं पडकं घर' म्हणायचे. त्या घराबद्दल बऱ्याच वदंता होत्या‌. आणि त्या चांगल्या नव्हत्या.

त्या घरात एके दिवशी तो राहायला आला.. सिद्धांत देशमुख. शहरात राहणारा. आईच्या मृत्यूनंतर गावाकडे परतला होता तो. तो शांत, अंतर्मुख होता. मोठा व्यावसायिक होण्याच्या महत्वाकांक्षेने शहरात गेलेला.‌ त्याचं काय झालं, हे त्यालाच ठाऊक. पण गावात परतल्यावर, तो कुणाशी फारसं बोलत नव्हता.

त्याला कुणी भावंडं नव्हतं. वडीलही पूर्वीच सोडून गेलेले. हे घर विकून निघून टाकण्याचा त्याचा विचार होता. पण त्याआधी काही दिवस, इथे राहायचं त्याने ठरवलेलं.

---

त्या रिकाम्या घरातली, त्याची पहिली रात्र.. घरात एक विचित्र शांतता होती. दारं खिडक्यांच्या फटींमधून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज, त्या वाऱ्यावर संथपणे डोलणाऱ्या झाडांची सळसळ, आणि छपरावर सतत टपटपणारे पावसाचे थेंब. एवढेच बारीकसारीक आवाज ऐकू येत होते.

रात्री बाराच्या सुमारास, सिद्धांतची जरा झोपमोड झाली. असं वाटलं, जणू कुणीतरी खालच्या जिन्यावरून चढतं आहे. "कदाचित मांजर असेल," स्वतःशी विचार करून त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले. इतक्यात खालच्या जिन्यावरूनच, अगदी बारीक आवाजातली खसखस ऐकू आली. किंवा ऐकल्या सारखा भास झाला. तो आवाज खूप बारीक होता. आणि सिद्धांत, अजूनही तसा झोपेतच होता.

---

दुसऱ्या दिवशी सकाळी, गावातला सिद्धांतचा मित्र- रमेश, त्याला भेटायला आला. घराच्या आत यायला मात्र, त्याने साफ नकार दिला. ते व्हरांड्यातच खुर्च्या टाकून बसले.

"तू या घरात राहतोस? एकटा?" त्यानं विचारलं. सिद्धांतनं मान डोलावली.

"इथे.. या घरात... काहीतरी आहे. काय ते सांगता येत नाही ; पण.." रमेशने त्याला लोकांमध्ये होणाऱ्या चर्चांबद्दल सांगितलं. काल रात्री झालेला भास सिद्धांतला आठवला पण त्यानं रमेशचं बोलणं उडवून लावलं.

___

त्या रात्री.. पुन्हा आवाज आला. अन् यावेळी, पावलांचा वा कुणाच्या हसण्याचा तो आवाज नव्हता.

"सिद्धांत..." कुणीतरी थेट त्याला, नाव घेऊन बोलावत होतं.

तो जरा बिचकला. धीर एकवटून तो खोलीबाहेर आला. –त्या अंधाऱ्या पॅसेजच्या कडेला, जिन्यापाशी एक काळपट आकार. स्त्रीचा. किंवा मुलीचा. चेहरा अस्पष्ट, पण डोळे... लालसर, टक्क पाहणारे.

तो डोळे गच्च मिटून किंचाळला. जेव्हा धीर करून त्याने डोळे हळूच उघडले, तेव्हा तो अंधारलेला कोपरा रिकामा होता.

---

अंथरूणावर पडून, तो स्वतःशीच विचार करत होता. थोड्या वेळापूर्वी त्याला दिसलेली ती आकृती, त्याच्या चांगल्याच ओळखीची होती ; पण, हे खरंच शक्य होतं 

आपलं बालपण सिद्धांतच्या डोळ्यांसमोर तरळलं. त्याची एक मैत्रिण होती. अगदी जिवाभावाची. सगळे तिला पिंकी म्हणायचे. अगदी लहान वयातच, अचानकपणे ती हे जग सोडून गेली होती. नक्की काय झालं होतं, हे कुणालाच समजू शकलं नाही. ती आता आपल्याला भेटणार नाही, असं आईकडून समजलं, तेव्हा सहाजिकच त्याला अतोनात दुःख झालेलं.


आणि आता, ती पिंकी त्याला दिसली होती. अशा स्वरूपात. हा एक अनपेक्षित धक्काच होता ; पण ते खरं होतं.


-------


सिद्धांतनं गावातल्या एका म्हातारीशी बोलताना पिंकीचा विषय काढला ; पण स्वतःला आलेल्या‌ अनुभवांचा उल्लेख त्याने टाळला.


"पिंकी.. तुझी बालमैत्रीण. लेकराचं नशीबच वाईट. पण एक सांगते. त्या घटनेच्या काही दिवसांनंतर, तुझे आईवडील जरासे अस्वस्थ दिसू लागलेले. आणि एक दिवस.. गावच्या एका मांत्रिकाला त्यांनी घरी बोलावलं होतं. काय प्रकार होता, ते गुपितच राहिलं. पण तू आता कल्पना करू शकतोस. तू या साऱ्या पासून अलिप्त राहिलास, ही देवाचीच कृपा."


सिद्धांत शहारला. आईची तेव्हाची अस्वस्थता त्यानं पाहिली होती. म्हणजे, पिंकीचं शरीर जरी नाहीसं झालं असलं तरी कुठल्यातरी पातळीवर तिचं अस्तित्व त्याच्या घरात होतं. तेव्हापासूनच.


त्याला आठवलं. एकदा आईनं त्याला सांगितलं होतं, "कधीही 'त्या' खोलीत जाऊ नकोस.”


त्या रात्री सिद्धांत खूप अस्वस्थ आणि घाबरलेला दिसत होता.. आपण पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींवर त्याला विश्वासाच बसत नव्हता.

म्हातारीनं दचकून पाहिलं. भिंतीला लागून असलेल्या जुनाट, लाकडी कपाटातून तो आवाज येत होता. म्हातारीची नजर पडताच, पुन्हा त्या कपाटात खडखडाट झाला. बंद दारं जोरजोरात हलू लागली. म्हातारीनं भयभीत होऊन सिध्दांतकडे पाहिलं. तोही स्तब्ध नजरेनं तिकडेच पाहत होता. कपाट खडखडत राहिलं. त्याची नीट न बसलेली कडी उघडली गेली‌. म्हातारी डोळे वासून एकटक पाहत होती. आणि.. एकदम कपाट उघडलं गेलं. तो प्रकार अनपेक्षित होताच ; पण.. सिद्धांतने हातातील टॉर्चचा उजेड आत टाकताच दिसलेलं दृश्य भयानक होतं. कपाटात एक प्रेत होतं. एका लहान मुलीचं. फिकुटलेलं. काहीतरी किंचाळून म्हातारी धडपडत मागे सरली‌ ; पण प्रकारातील भयानकता इथेच संपत नव्हती. त्या मुलीचे डोळे खाडकन उघडले. ते मोठे, बुबुळ नसलेले, पांढरेफटक डोळे म्हातारीवर खिळलेले. मग फळीवर कललेलं तिचं डोकं वर झालं. आणि एकदम तिने बाहेर उडी घेतली. ती, भेसूरपणे हसू लागली.


"आजीबाई.. ओळखलं का मला."


"अं..अं नन्न." म्हातारीच्या तोंडून काहीतरी कण्हल्यासारखा आवाज आला.


"कित्ती वाईट्ट आहेस गं तू. असं वागलीस माझ्याशी." ती‌ म्हणाली. उद्विग्न स्वरात.


"नाही.. नाही. माझ्याकडून चूकीने तसं घडलं. मी मुद्दाम नाही काही.."


"पण माझी तुला फिकीर नव्हतीच ना. माझं काहीही झालं तरी, तुला काहीच वाटणार नव्हतं." त्या आवाजात दु:ख, खिन्नता होती."


"नाही.. तसं."


"बस्स.." रागाने किंचाळून ती तरातरा चालत म्हातारी जवळ आली. आणि तिनं म्हातारीच्या अंगावर झेप घेतली. तिची पांढरीफटक, अणकुचीदार नख्यांची बोटं म्हातारीच्या गळ्याभोवती आवळली गेली. डोळे घट्ट मिटून सिद्धांतने मान फिरवली. काहीच क्षणात म्हातारी गतप्राण झाली. पिंकी उठून सिद्धांतकडे वळली.


"थॅंक्यू, सिद्धू." ती म्हणाली. सिद्धांतने हलकेच मान हलवली. दोघांचे डोळे पाणावले होते.


" जाते..." असं म्हणून ती अदृश्य झाली.


___


त्यादिवशी म्हातारीशी बोलून घरी परतल्यानंतर, सिद्धांतने मनाशी काहीतरी ठरवलं होतं. त्या रात्री, तो कुलूप काढून त्या खोलीत शिरला होता.‌ त्याला पिंकी भेटली होती. किती वर्षांनी ! त्याने पिंकीची मागितली होती. त्याचा गुन्हा नसला, तरी त्याच्या घरीच "ती" दुर्घटना घडली होती. आणि नेमका कुणाचा गुन्हा होता हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पिंकी कडून त्याला जे समजलं, ते अनपेक्षित आणि धक्कादायक होतं.


___


अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट.. सिद्धू आणि पिंकी. अत्यंत द्वाड मुलं. सुट्टीच्या दिवशी तर पिंकी आणि सिद्धूचा, पूर्ण दिवस घरभर दंगा चालायचा.


म्हातारीचा, म्हणजेच ताराबाईचा सिद्धांतच्या कुटुंबाशी चांगलाच घरोबा होता. वरचेवर ती त्यांच्या घरीच असायची. ताराबाई मोठी कजाग आणि शिघ्रकोपी. लोक तिला जरा वचकूनच असत.


मुलं दंगामस्तीत करताना तिला बरीच सतावत. तिची टर उडवत. तिला सहाजिकच सहन व्हायचं नाही. म्हातारी त्यांच्यावर कधीकधी रागावायची. खेकसायची. पण मुलं कुठं मनावर घेतात ?


असंच एका दिवशी, सिद्धांतच्या घरी कसलासा कार्यक्रम होता. गावातील लोकांची वर्दळ सुरू होती. म्हणून सिद्धू आणि पिंकीने, लपाछपी खेळायचं ठरवलं. कुणाला त्रास नको म्हणून.

घरात कार्यक्रम, म्हणून ताराबाईचीही गडबड सुरू होती ; पण नेमकी पिंकी आपल्याला लपविण्यासाठी तिच्याच मागे लागली. ताराबाईनं तिला शांतपणे समजावून पाहिलं. जरा दटावून पाहिलं ; पण ती काही ऐकेना. मनातून चांगलीच चिडलेली ताराबाई मनाशी काहीतरी ठरवून तिला घरातील स्टोअर रूममध्ये घेऊन आली. तिथल्या लाकडी कपाटात तिनं पिंकीला दडवलं. आणि सवयीनं हलकीशी कडी लावून ती घाईघाईने बाहेर पडली. दार तिने लोटून घेतलं. आपल्या हातातील काम उरकल्यावर पिंकीला बाहेर काढावं, किंवा सिद्धूला सांगावं असं तिने ठरवलं ; पण पुढे कामाच्या गडबडीत ते सारंच विसरली.

(पिंकीच्या तोंडून सिद्धांतला कळालेला वृत्तांत इथपर्यंतच. पुढच्या गोष्टी त्यालाही ठाऊकच होत्या.)


बऱ्याच वेळानं, थकून सिद्धांत सगळ्यांना विचारायला लागला. बायका तिला इथं तिथं पाहू लागल्या ; तेव्हा ताराबाईच्या ध्यानात आलं. ती हादरली.


एकदा तिला वाटलं, पटकन जाऊन पिंकीला बाहेर घ्यावं ; पण मग स्वतःचा विचार मनात आला. कुणाच्या नकळत जाऊन पाहणं जवळपास‌ शक्यच नव्हतं. त्यात गुदमरून पोरं चक्कर येऊन पडली असेल, तर तिला एकटी बाहेर कशी काढणार ? लोकांना काय सांगणार ? शेवटी ती गप्पच बसली.


बराच वेळ पिंकी सापडेना. साऱ्यांनाच ती गोष्ट समजली. लोकांनी घरात शोधाशोध केली. बऱ्याच वेळानं जेव्हा स्टोअर रूममध्ये ती सापडली, तेव्हा इतकावेळ हवे शिवाय गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला होता. खरंतर ती मुळातच जरा नाजूक प्रकृतीची होती.

तिला त्या खोलीतील कपाटात कुणी बंद केलं, हे कुणालाच, कधी समजू शकलं नाही.

___


त्या घटनेच्या काही दिवसांनी सिद्धूच्या आईवडलांना घरात काही काही गोष्टी जाणवू लागल्या. -ताराबाईने तर त्या दिवसापासून त्या घरात येणं-जाणं बंदच केलेलं. - खरं खोटं करण्याच्या फंदात न पडता सिद्धूच्या आईवडिलांनी गावातल्या मांत्रिकाला बोलावून घरात काहीबाही गोष्टी केल्या. त्यानंतर, तो प्रकार कमी झाला असावा.


त्या घरात जीव सोडलेल्या पिंकीचा आत्मा तिथेच राहिला होता. त्या चिमुकलीलाही जीवनाची आसक्ती असणारच. आणि धसमुसळेपणाने, बेफिकीरीने आपल्याला बंदिस्त खोलीतील कपाटात बंद करून गेलेल्या ताराबाईमुळेच आपले हे हाल झाले हे तिला कळत असेलच. त्याबद्दल संतापही होत असणार. त्या संतापाच्या धगीनेच, तिचं अस्तित्व या घराशी जोडून ठेवलं होतं. आणि सिद्धांत पुन्हा त्या घरात आल्यावर, शेवटी तिची प्रतिक्षा संपली. त्यानं ताराबाईला तिच्यासमोर आणलं. आणि शेवटी तिने आपला सूड घेतला.

वाचनासाठी शेअर... रवि जवंजाळ...सांगोला.




No comments:

Post a Comment

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल….

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल…. साखर सोडणे जितके कठीण आहे तितके त्याचे परिणाम अधिक धक्कादायक आहेत. केवळ एक...