Thursday, 2 October 2025

अनाकलनीय घटना... अपहरण


८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी.

असं काय घडलं होतं म्हणता? न्यू यॉर्क ट्रिब्यूनने ठळक मोठ्या लालभडक अक्षरांत फलक लावला होता.
“अनपेक्षित दुर्घटना. भयंकर गूढ परिस्थिती. व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गायब. दोन नोकर गुदमरल्या अवस्थेत सापडले.
दोन्ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा मागमूस नाही. या घटनेमागच्या भयानक शक्यता लक्षात घेता देश हादरला आहे.”

वृत्तपत्रांचा खप अनेकपटींनी वाढला, पण यापेक्षा जास्त बातमी कोणाकडेच नव्हती. सगळीकडचे व्यापार, व्यवहार थांबले. शेअरबाजार अर्ध्या तासात वीस टक्क्यांनी कोसळला. देशावर अवकळा पसरली. हा बनाव विरोधी पक्षाने रचला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पण काही तासांतच ही सनसनाटी बातमी खरी असल्याचं निश्चित झालं.

न्यू यॉर्क सनने संध्याकाळच्या आवृत्तीत ही दुर्दैवी बातमी छापली :
“राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी दोघेही खरोखरीच नाहीसे झाले आहेत. दोन्ही नोकरांची जबानी घेऊन, भयंकर कारस्थानात सामील असल्याच्या संशयावरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे व्हिजिटिंग कार्ड व्हाईट हाउसच्या प्रवेशद्वाराजवळ सापडले. एखादं काळंकुट्ट राजकीय कारस्थान उघडकीस येणार? “

दुसरा दिवस उजडला. परिस्थिती जैसे थे. सर्व प्रकारच्या अफवांचं पेव फुटलं. सुन्न झालेलं मंत्रिमंडळ जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांचे सांत्वनपर संदेश स्वीकारू लागलं. बातमीसाठी टपून बसलेल्या वृत्तपत्रांना हे संदेश जसेच्या तसे देण्यात येऊ लागले. इतर कोणत्याही प्रकारची बातमी छापली जाऊ नये, असा आदेश उपाध्यक्षांनी दिला, आणि वृत्तपत्रं तो कसोशीने पाळू लागली. संपूर्ण देशावर रहस्याचं सावट पसरलं. गुप्तहेरखातं हतबल ठरलेलं पाहून जणू प्रत्यक्ष नैराश्य त्यांना पाहून खदखदा हसू लागलं.
सगळीकडे एकच चर्चा. “काय? काही कळलं का?” “छे. काही नाही.”

मॅसॅच्युसेट्सचे गव्हर्नर म्हणाले, “यात काय आश्चर्य! दरवर्षी हजारो मारेकरी घुसताहेत देशात. प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षसुद्धा सुरक्षित नव्हते म्हणायचे! देवा, वाचव बाबा आमच्या देशाला.”

काही दिवसांनी वृत्तपत्रांनी या रहस्यमय अपहरणाबद्दलची सविस्तर बातमी छापली.

व्हाईट हाऊसच्या मुख्य दरवाजाजवळच्या रात्रीच्या पहारेकऱ्याची जबानी:
“माझं नाव जॉर्ज हेनरी. वय चौतीस. माझा जन्म या देशात झाला. माझा बाप गुलाम होता. रात्री सुमारे दीडच्या सुमाराला मुख्य दरवाजावर दोन थापा मारल्याच्या आवाजाने मला जाग आली. म्हणजे मी तसा काही झोपलो नव्हतो.. जरासा पेंगत असेन. कोण आहे, असं मी विचारल्यावर बाहेरून आवाज आला की राज्यसचिवांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे, ते अध्यक्षांना भेटायला आलेत. अध्यक्ष झोपलेत असं मी सांगितलं, पण ताबडतोब भेटलं पाहिजे असं ते म्हणाले. आवाज ओळखीचा होता, म्हणून मी दार उघडलं. राज्यसचिव आत आले. त्यांनी त्यांचा नेहमीचा राखाडी रंगाचा ओव्हरकोट आणि टोपी घातली होती. आपलं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हातात देऊन, ते अध्यक्षांना नेऊन दे, असं ते म्हणाले. दार उघडंच होतं, त्यामुळे माझ्या लक्षात आलं, की त्यावेळी पाऊस पडत होता. पोर्चखाली त्यांची बग्गी उभी होती, पण गाडीवान दिसला नाही. मी झुकून त्यांना अभिवादन केलं, आणि वळून आत जायला निघालो. तेव्हढ्यात कसलासा विचित्र वास आला. यापुढचं काही मला आठवत नाही.”

जॉर्ज हेनरी प्रामाणिकपणे आणि हुशारीने जबानी देत होता. उलटतपासणीत त्याने सांगतलं, की तो आवाज राज्यसचिवांचाच होता, पण ते जरा सर्दी झाल्यासारखे बोलत होते. ती बग्गीही राज्यसचिवांचीच होती, कारण दोन्ही घोडे त्याच्या ओळखीचे होते. एक काळा, एक करडा. त्यावेळी बाहेर दुसऱ्या कोणाचाही आवाज ऐकू आला नव्हता.
मग त्याला क्लोरोफॉर्म दाखवण्यात आलं. तो वास त्याने ओळखला. पण त्या रात्री त्या वासात दुसराही एक आंबटसर वास मिसळलेला होता, असं तो म्हणाला. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यावर हीच जबानी त्याने दरवेळी दिली, आणि त्यात कसलाही फरक किंवा गोंधळ जाणवला नाही. एकंदर परिस्थिती राज्यसचिवांकडे संशयाचं बोट दाखवत होती.

पुढचा साक्षीदार: दुसऱ्या मजल्यावरचा रात्रीचा पहारेकरी. हा अतिशय घाबरलेला, थोडासा गोंधळलेला दिसत होता. पण त्याची जबानी साधी सरळ होती:
“सर, माझं नाव फ्रॅंक स्टीव्हन. जन्मापासून मी आपला काळ्या वर्णाचाच आहे. मी बारा वर्षांचा असताना माझा जन्म ओहायो राज्यात झाला. (या ठिकाणी साक्षीदाराच्या तोंडावर बर्फाच्या पाण्याचे हबके मारण्यात आले. मग तो भानावर आला.) म्हणजे, मी बारा वर्षांचा असताना ओहायो राज्यात गेलो. माझा जन्म मिसिसिपी राज्यात झाला होता. मला वाटतं, आज माझं वय बेचाळीस असेल. त्या रात्री दीड वाजता, किंवा कदाचित अडीच वाजले असतील, मला पावलांचा आवाज आला. कोणीतरी जिन्यावरून वर येत होतं. मी अर्ध्या जिन्यात जाऊन पाहिलं, तर आपले राज्यसचिव. त्यांची टोपी ओळखली मी. आता इतक्या मध्यरात्री ते आत कसे काय आले, ते एका देवालाच ठाऊक. त्यांनी मला अध्यक्षांची खोली दाखवायला सांगितलं. तसे ते दरडावूनच बोलत होते, पण मला वाटलं, एवढे मोठे राज्यसचिव आहेत, दरडावले तर काय नवल.
मग मी त्यांना अध्यक्षांच्या खोलीजवळ घेऊन गेलो. आता दार वाजवणार, इतक्यात सचिवांनी मला थांबायला सांगितलं. आधी एक सिगार ओढणार का? म्हणाले. मी तर थक्कच झालो. याआधी कधी त्यांनी मला सिगार बिगार दिला नव्हता. त्यावेळी सगळीकडे एक विचित्र वास येत होता. औषधांच्या दुकानात येतो ना, तसला. इतकंच आठवतं मला, सर.”

फ्रॅंक स्टीव्हनच्या उलटतपासणीतून काही वेगळं हाती लागलं नाही. पण त्याला आणखी काही तपशील आठवले. त्याच्याशी बोलता बोलता राज्यसचिव तोंडावर रुमाल धरून खोकत होते. त्यांनी ओव्हरकोट कानावरून ओढून घेतला होता, आणि त्यांचा एक हात सतत ओव्हरकोटात दडलेला होता. त्यांची टोपी डोक्यावरच होती, या गोष्टीचं फ्रँक स्टीव्हनला आश्चर्य वाटलं होतं, कारण ते नेहमी आत आल्याबरोबर टोपी काढत असत. पहिल्या साक्षीदाराप्रमाणेच यानेही क्लोरोफॉर्मचा वास ओळखला, आणि त्यात दुसराही एक वास होता, हेही सांगितलं. आपण शुद्धीवर आलो तेव्हा आपले हातपाय बांधलेले होते आणि श्वास गुदमरलेला होता याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केलं. दोन्ही साक्षीदारांनी एकमेकांच्या अपरोक्ष दिलेली जबानी तंतोतंत जुळत होती. म्हणजे त्यात तथ्य होतं नक्कीच. राज्यसचिव संशयाच्या भोवऱ्यात सापडले. सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गुप्त पहारा बसवण्यात आला. अजून अटकेची काही हालचाल नव्हती.

यानंतरचा महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे राष्ट्राध्यक्षांचा स्वीय सहाय्यक. त्याने शपथेवर सांगितलं, की त्या रात्री डोकेदुखीमुळे राष्ट्राध्यक्ष लवकर झोपले होते. मला विश्रांती हवी आहे, जराही आवाज गडबड होऊ देऊ नकोस, असा त्यांचा आदेश होता.

इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी, दोघेही जेफरसनच्या साधेपणाच्या विचारसरणीने भारावलेले होते. व्हाईट हाऊसमध्ये येण्याअगोदर ते आपल्या घरात जसे राहत, तसेच अजूनही राहत होते. त्यांनी आपले खाजगी सुरक्षा अधिकारी काढून टाकले होते. इतक्या मोठ्या मानाच्या पदावर असूनही ते अगदी अनौपचारिक साधेपणाने राहत, झोपत, इतकंच काय,खाशा पाहुण्यांना पाहुणचारही साधाच मिळे. त्यांच्या शयनगृहाकडे जाणाऱ्या दारांना क्वचितच कधी कुलुपं घातलेली दिसत. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी त्या दोन पहारेकऱ्यांच्या हातात सोपवलेली होती.

त्यांची मुलं आणि मुलांच्या दाया आजूबाजूच्या खोल्यांतून झोपत. त्या रात्री यापैकी कोणीही कसलाच आवाज ऐकला नव्हता. थोडक्यात, मध्यरात्रीनंतर व्हाईट हाऊसमध्ये कोण शिरलं, ते तुरुंगात डांबलेल्या त्या दोन पहारेकऱ्यांशिवाय कोणालाच ठाऊक नव्हतं. दरम्यान, साध्या वेषातले रक्षक व्हाईट हाऊसमध्ये सर्वत्र पेरण्यात आले. ते प्रत्येकावर आपली सराईत करडी नजर ठेवू लागले.

रवि जवंजाळ … सांगोला

2)अपहरण – भाग २

अपहरण – भाग २

९ जूनला सकाळी अकरा वाजता वॉशिंग्टन पोलीस खात्याच्या प्रमुखांना बरोबर घेऊन इन्स्पेक्टर बायरन्स राज्यसचिवांच्या घरी गेले, आणि त्यांच्या खाजगी भेटीची मागणी केली. तिथे खूप गडबड उडाली होती. सर्व राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती तिथे हजर होत्या. त्यांची व्हिजिटिंग कार्डं आत पाठवली जात होती. त्या भयंकर बातमीवर तावातावाने चर्चा झडत होत्या. टपाल खात्यातून येणाऱ्या तारांचा तर जणू पाऊस पडत होता. त्या भयानक घटनेमागे काहीतरी राजकीय कट किंवा कसलातरी बदला घेण्याचं कारस्थान असल्याचा संशय हळूहळू पक्का होऊ लागला होता. नेतेमंडळी उदास चेहऱ्यांनी एकमेकांशी कुजबुजत होती.

खाजगी भेट मागणारी ती दोन कार्डं पाहून राज्यसचिव हलकेच युद्धसचिवांना म्हणाले, “आता रहस्य थोडंसं तरी उलगडेल.”
तिघांची एकांतात भेट झाली. वॉशिंग्टनच्या पोलीस प्रमुखांनी झट्कन विषयाला हात घातला. माजी सैनिक असलेले हे अधिकारी अत्यंत प्रामाणिक आणि रोखठोक होते.

“सचिव महाशय, गेल्या कित्येक वर्षांत दिसला नसेल, असा काळाकुट्ट दिवस आपल्या राष्ट्रात आज उगवला आहे. माफ करा, पण आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणं आवश्यक आहे.”इन्स्पेक्टर बायरन्स खिडकीकडे पाठ करून बसले होते. ही त्यांची नेहमीची पद्धत. खोलीत शिरताक्षणी त्यांनी मुसंडी मारून दोन खुर्च्या आणि एक टेबल यांच्या मधली जागा पटकावली होती. त्यामुळे राज्यसचिवांना नाईलाजाने खिडकीसमोर बसावं लागलं होतं. खिडकीतून पडणाऱ्या प्रकाशामुळे त्यांच्या निर्मळ चेहऱ्यावरचे अगदी सूक्ष्म हावभावदेखील इन्स्पेक्टरना स्पष्ट दिसत होते.

“सर, हे कार्ड आपल्या ओळखीचं आहे का?” बंदुकीच्या गोळीसारख्या भेदक प्रश्नाबरोबर ते कार्ड झपकन राज्यसचिवांच्या गुढघ्यावर पडलं, तेही नेमकं सुलट बाजूने. प्रख्यात जादूगार हॅरी केलर सुद्धा अशा सफाईने ही करामत करू शकला नसता. सचिवांनी त्या कार्डाकडे क्षणभर पाहिलं, आणि आश्चर्याने म्हणाले, “हो, माझंच आहे हे कार्ड.”

“आपल्याजवळ अशी आणखी कार्डं आहेत का?” इन्स्पेक्टर बायरन्सनी प्रथमच तोंड उघडलं. हा प्रश्न ऐकून सचिव गोंधळले, पण त्यांनी खिशातल्या पाकिटातून आणखी काही कार्डं काढून इन्स्पेक्टरांच्या हातात दिली. इन्स्पेक्टरांनी आदराने झुकून ती स्वीकारली. क्षणभर त्या कार्डांची कसून तपासणी झाली.
“माफ करा, पण ही कार्डं आपण राष्ट्राध्यक्षांच्या भेटीसाठी वापरता का?” पोलीस प्रमुखांनी प्रश्न केला. इन्स्पेक्टर बायरन्सची नजर अजूनही त्या कार्डांवर रोखलेली होती.
“नाही, म्हणजे हो, वापरतो. कधी रात्री अपरात्री महत्त्वाच्या कामासाठी तातडीने भेटावं लागलं, तर वापरतो.” सचिव म्हणाले. आता ते जरा अस्वस्थ वाटू लागले.

“आपण दोघे शेवटच्या वेळी कधी भेटलात ते कृपया सांगू शकाल?” इन्स्पेक्टर बायरन्सनी इतरांच्या नकळत हळूच वर पाहून अगदी सहज गप्पा मारण्याच्या स्वरात विचारलं. राज्य सचिवांचा चेहरा सैलावला. “हो, सांगतो. काल दुपारी तीन ते चार या वेळेत मी ब्ल्यू रूम मध्ये एका अनौपचारिक समारंभाला गेलो होतो. समारंभानंतर मी राष्ट्राध्यक्षांची खाजगी भेट घेतली. तीच आमची शेवटची भेट.” हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले नसतील कदाचित, पण आवाज भावनेने ओथंबला होता.

“आता केवळ एक औपचारिक प्रश्न. कालच्या मध्यरात्रीपासून आज पहाटे दोन वाजेपर्यंत आपण कुठे होता?” पाणी मागावं, तितक्या सहजपणे इन्स्पेक्टर बायरन्सनी विचारलं.

“या प्रश्नांचा अर्थ काय? माझ्यावर संशय?” राज्यसचिवांनी जोरदार प्रतिप्रश्न केला. त्यांच्या डोळ्यांत विरोधाचा अंगार फुलला होता, आणि एकंदर प्रसंगामुळे उत्तेजित होऊन चेहरा पांढराफटक पडला होता.

“छे छे!! मुळीच नाही. शांत व्हा, सर. मी फक्त चौकशी करतो आहे. अशी औपचारिक चौकशी आम्हांला करावीच लागते.” एखादी माशी उडवून लावावी तसा सहज हात हलवीत इन्स्पेक्टर म्हणाले. राज्यसचिवांनी किंचित विचार केला, आणि वळून एक बटण दाबलं. ताबडतोब एक गणवेषधारी सेवक आला. राज्यसचिवांनी हलकेच त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. त्या सेवकाने झुकून अभिवादन केलं आणि तो निघून गेला.

“क्षणभर थांबा. आता माझ्याभोवतीचं रहस्य उलगडणार आहे.” राज्यसचिव अभिमानाने म्हणाले, “काल मध्यरात्रीपासून पहाटे अडीच वाजेपर्यंत मी या खोलीत होतो.माझ्याबरोबर दोन सद्गृहस्थ होते. तुम्ही त्यांना ओळखता. हे पहा आलेच ..” त्याचवेळी दारावर पडलेल्या थापेला “आत या.” असं उत्तर मिळालं. युद्धसचिव आणि गृहसचिव आत आले. राज्यसचिव अत्यंत अदबशीरपणे म्हणाले, “इन्स्पेक्टर, कृपया आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारता का?”त्यांच्या उत्तरातून उघडकीला आलं, की पहाटे अडीच वाजेपर्यंत या तिन्ही सचिवांची अनौपचारिक बैठक चालली होती. कॅनडाबरोबरच्या युद्धाचा प्रश्न अमेरिकेला भेडसावत होता, त्याबद्दल ते चर्चा करत होते. हे समजल्यानंतर पोलीस प्रमुखांनी मनापासून माफी मागितली. इन्स्पेक्टर बायरन्स गंभीर विचारात पडले. पण मग जरा थांबून त्यांनी रोखठोक सवाल केला.
“अमेरिकेच्या इतिहासातली ही सर्वात रहस्यमय आणि विस्मयकारक घटना आहे. मी गोंधळून गेलो आहे.” उपस्थितांना गोपनीयतेचा इशारा देऊन त्यांनी सगळी कहाणी ऐकवली, आणि राज्यसचिवांना विचारलं, “वॉशिंग्टनमध्ये किंवा इतरत्र, तंतोतंत तुमच्यासारखा दिसणारा कोणी माणूस तुम्हांला ठाऊक आहे का? त्याला पाहून दोन्ही पहारेकरी फसले असतील. हं.. दोघे जरासे पेंगत असल्यामुळे ते सोपं झालं असेलही.”
तिघांनी खूप विचार केला, पण त्यांना असं कोणी ठाऊक नव्हतं. राज्यसचिव देखणे नसले, तरी चारचौघांत लक्ष वेधून घेण्याइतके रुबाबदार होते.
त्यांच्या गालावरचे शानदार कल्ले पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरत असत. देशात दुसऱ्या कोणाचे कल्ले इतके शानदार नसतील, असा त्यांना अभिमान होता.

“सचिव महोदय, कृपया आणखी एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल का?” इन्स्पेक्टर बायरन्स अदबीने म्हणाले, “पहारेकऱ्याने तुमच्या बग्गीचे घोडे ओळखले. म्हणजे रात्री बारा ते पहाटे दोन या वेळात तुमची बग्गी तुमच्या घराजवळ होती, की नव्हती? गाडीवान कधीकधी विचित्र वागतात.”
सचिवांनी गाडीवानाला बोलावणं पाठवलं. “मी मध्यरात्रीपर्यंत एका मित्राच्या घरी होतो, तिथून सरळ इथे आलो.” ते म्हणाले.
“हे मित्र कोण?” भर्रदिशी आलेल्या या प्रश्नात अदब होती, पण इन्स्पेक्टरांचा माग काढण्याचा स्वभाव लपत नव्हता.
“पॅटागोनियाचे राजदूत.” सचिवांनी प्रौढीने उत्तर दिलं, “गाडीवान मला सोडून परत गेला. त्याला मी आज सकाळी अकरा वाजता बोलावलं होतं.”
पण गाडीवान अजून आलेला नव्हता. सकाळपासूनच्या या गोंधळात राज्यसचिवांचं अकरा वाजता ठरलेलं काम रद्द झालं होतं. अर्धा तास उलटून गेला. पोलीस प्रमुखांनी निरोपावर निरोप पाठवले. शेवटी एकदाचा गाडीवान उतावीळपणे वाट बघणाऱ्या त्या पंचकडीच्या समोर हजर झाला. पण हे काय? नेहमी वाखाणल्या जाणाऱ्या रुबाबदार रुपाऐवजी आज त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. त्यावर पट्ट्या बांधल्या होत्या. घाईने कसेबसे कपडे चढवून तो आला होता. तो अपराधी स्वरात काहीतरी बरळू लागला. माफी मागू लागला.
“यात माझा काही दोष नाही, सर. यात सैतानाचा हात आहे. घोडे बरे आहेत, बग्गी ठीक आहे. शुद्ध आली तेव्हा मी गटारात होतो, सर. माझी पाठ रक्ताने भिजली होती. घोडे आज सकाळी सापडले. मला नोकरीवरून काढू नका सर. पंधरा वर्षं ही बग्गी चालवतोय मी. अरे देवा! माझं काय होणार आता?” नेहमी शुद्ध, नेटकं बोलणाऱ्या गाडीवानाचे शब्द रात्रीच्या घटनेमुळे कसेतरी भेलकांडत होते.

गाडीवानाच्या जबानीनुसार, तो रात्री बग्गी आणि घोडे घेऊन तबेल्याकडे चालला होता. धुकं पडलं होतं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाने त्याला हाक मारली. रस्त्यात चिटपाखरू नव्हतं. पलिकडच्या गल्लीतही कोणी नव्हतं, फक्त काळोख पसरला होता. गाडीवान थांबला. समोर खुद्द राज्यसचिव पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. ते त्याला खुणा करत होते, “थांब. खाली उतर.” त्यांचा चेहरा अंधारात होता, आणि आवाज अस्पष्ट येत होता. गाडीवान खाली उतरताच त्यांनी एक चांदीचा पेला त्याच्यासमोर धरला. “किती दमट हवा आहे. घे, यातला एक घोट घे.” ही त्यांची अनपेक्षित आज्ञा ऐकून गाडीवान चकित झाला होता,पण त्यांचा अवमान कसा करणार? त्याने एक घोट घेतला होता. लगेच त्याला भोवळ येऊ लागली होती. भुतांसारख्या आणखी दोन तीन काळ्या आकृत्या त्याच्या डोळ्यांसमोर दिसू लागल्या होत्या. यानंतर आपण पळून जायचा प्रयत्न केला, की बग्गीत चढायचा, ते त्याला नीटसं आठवत नव्हतं. त्यावेळी एक विचित्र वास त्याच्या मस्तकात पोहोचला होता, आणि त्याची शुद्ध हरपली होती. पहाटे सुमारे चार वाजल्यानंतर त्याला शुद्ध आली होती. त्यानंतर तो कसाबसा धडपडत तबेल्यात पोहोचला होता, आणि घोडे गायब झालेले पाहून हतबुद्ध झाला होता. मग त्याच्या एका परिचिताने तासभर सगळं परिसर पालथा घातला होता, आणि त्याला स्मिथसोनियन संस्थेजवळ दोन्ही घोडे चरताना सापडले होते. ते पळून गेले असावेत, असा त्या परिचिताचा समज झाला. गाडीवानाने त्या परिचिताला पाच डॉलर दिले होते, आणि बजावलं होतं, “याबद्दल कुठे बोलू नकोस.” आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील, अशी भीती त्याला वाटत होती. राष्ट्राध्यक्षांचं अपहरण झाल्याचं त्याने ऐकलं होतं, आणि आता या प्रकरणात आपण गोवले जाऊ या विचाराने तो हादरला होता.

गाडीवानाची उलटतपासणी घेण्यात आली, त्याच्या परिचिताचं नाव नोंदवून घेण्यात आलं, आणि “तुझी नोकरी सुरु राहील. घाबरू नकोस, घरी जाऊन विश्रांती घे.” असं सांगून त्याला सोडून दिलं गेलं. बग्गीची कसून तपासणी करण्यात आली. पण ती अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करण्यात आली असावी. तिथे काही भयंकर घडल्याचा मागमूस नव्हता, अगदी रक्ताचा डागदेखील नव्हता. तर ही इतकी माहिती महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत गोळा झाली होती. संपूर्ण अमेरिकेतल्या गुप्तहेरांनी एकत्रितपणे केलेलं हे काम होतं. अनेक धागेदोरे हाती लागले होते, आणि त्यांचा निकराच्या वेगाने पाठपुरावा करण्यात आला होता. पण अजून काहीही हाती लागलं नव्हतं. असंख्य लोकांना अटक करण्यात आली होती, पण कोणावरच आरोप सिद्ध होत नव्हता. समजलं होतं ते इतकंच.. कोणातरी खलनायकाने राज्यसचिवांचा वेष धारण करण्याचं धारिष्टय केलं होतं. त्याच्या हुबेहूब वेषांतराने तीन नोकर फसले होते. त्या खलनायकाने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नींची अगदी त्यांच्या अंथरुणातून उचलबांगडी केली होती. कदाचित बळाचा वापर झाला असावा. अत्यंत थोड्या वेळात हे घडलं असावं, पण दोघांना आपले काही कपडे आणि रोजच्या वापराच्या वस्तू घेण्याची मुभा मिळाली असावी. अपहरणकर्त्यांनी या निर्घृण कृत्यासाठी सरकारी बग्गी वापरण्याचं धाडस केलं होतं. त्यांनी कसलाही माग सोडला नव्हता. त्यातून त्या रात्री धुकं आणि पाऊस असल्यामुळे ते कुठल्या दिशेने गेले, हेही समजलं नव्हतं.

ते उघडपणे रेल्वेतून दूर जाऊ शकणार नाहीत, अशा विचाराने वॉशिंग्टन आणि आजूबाजूच्या पंधरा मैलांचा परिसरातलं प्रत्येक घर धुंडाळण्यात आलं होतं. तसंच नदीत, खाडीत काही तरंगताना दिसतंय का, ते शोधण्यात आलं होतं. प्रत्येक रस्त्यावर पहारा बसवला गेला होता. होते कुठे ते खलनायक आणि त्यांची ती अमूल्य लूट?

थोडक्यात, संपूर्ण सुसंस्कृत आणि प्रगत जगाला भयभीत आणि हताश करणारी घटना घडली होती. अमेरिकेचे माननीय राष्ट्राध्यक्ष आपल्या पत्नीसह गायब झाले होते. त्यांचं अपहरण झालं होतं.



No comments:

Post a Comment

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल….

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल…. साखर सोडणे जितके कठीण आहे तितके त्याचे परिणाम अधिक धक्कादायक आहेत. केवळ एक...