आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले आणि ती आपल्या पती व सासूबाईंसोबत सासरी राहू लागली.
थोड्याच दिवसांत आरतीला जाणवू लागले की तिची सासूबाईंसोबत पटत नाही. सासू जुन्या विचारांची होती, तर आरती नवनवीन विचारांची. दोघींमध्ये रोज वादविवाद होऊ लागले.
दिवस सरले, महिने गेले, वर्षही निघून गेले. सासू टोमणे मारणे थांबवत नव्हती, आणि आरतीही प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटत नव्हती. परिस्थिती अधिकच बिकट झाली. आरतीला आता तिच्या सासूबाईंबद्दल पूर्णतः द्वेष निर्माण झाला होता.
आरतीसाठी सर्वात कठीण वेळ तो असायचा, जेव्हा तिला भारतीय परंपरेनुसार सासूबाईंना इतरांसमोर सन्मान देणे भाग पडायचे. आता आरतीला तिच्या सासूबाईंपासून कसेही करून सुटका करायची होती.
एके दिवशी सासूबाईंशी मोठा वाद झाला, आणि पतीनेही आईची बाजू घेतली, तेव्हा आरती संतापून माहेरी निघून गेली.
आरतीचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते.
तिने रडत-रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली, “बाबा, मला काही करून विष द्या , जे मी त्या म्हातारीला पाजीन. नाही तर मी सासरी परत जाणार नाही!”
मुलीचे दुःख समजून घेत वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले, “बेटा, जर तू सासूबाईंना विष देऊन मारलंस, तर तुला पोलीस पकडतील आणि मलाही, कारण विष मीच दिलं असेल. त्यामुळे असं करणं योग्य नाही.”
पण आरती हट्टाला पेटली, “तुम्ही मला विष दिलंच पाहिजे. आता त्या म्हातारीला मी कदापिही पाहू शकत नाही!”
थोडं विचार करून वडील म्हणाले, “ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे. पण तुला तुरुंगात जाताना पाहायची माझी इच्छा नाही. म्हणून जसं मी सांगतो, तसंच करायला हवं. मंजूर असेल, तर सांग.”
आरतीने विचारले, “काय करावं लागेल?”
वडिलांनी एक पुडी तिच्या हातात देत सांगितले, “तुला रोज या पुडीमधून एक चिमूटभर विष सासूबाईंच्या जेवणात मिसळायचं आहे.
थोड्या प्रमाणात असल्याने त्या लगेच मरणार नाहीत, पण हळूहळू आतून अशक्त होऊन ५-६ महिन्यांत मरतील. सगळ्यांना वाटेल की त्या नैसर्गिक मृत्यू येऊन मेल्या आहेत.
पण तुला फार सावध राहायला हवं, जेणेकरून तुझ्या पतीला संशय येऊ नये. त्यामुळे आता पासून सासूबाईंशी वाद घालायचा नाही, त्यांची सेवा करायची आहे.
जर त्या तुला टोमणे मारतील, तर शांत राहायचं. प्रत्युत्तर द्यायचं नाही. हे सर्व जमेल का तुला?”
आरतीने विचार केला, सहा महिन्यांचीच तर गोष्ट आहे. नंतर सुटका मिळेलच. तिने वडिलांचं ऐकलं आणि पुडी घेऊन सासरी गेली.
सासरी जाताच आरतीने दुसऱ्या दिवशीपासून सासूबाईंच्या जेवणात एक चिमूटभर विष मिसळायला सुरुवात केली.
त्याचसोबत तिने वर्तनही बदलले. आता ती सासूबाईंच्या टोमण्यांना हसत हसत ऐकत होती.
रोज त्यांच्या पायांचे मालिश करत होती, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत होती आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होती.
हळूहळू काही आठवड्यांत सासूबाईंच्या स्वभावातही बदल होऊ लागला. सासूबाई आता आरतीच्या सेवा-बुद्धीमुळे समाधान व्यक्त करू लागल्या.
चौथ्या महिन्यापर्यंत आरती आणि सासूबाईंच्या नातेसंबंधांमध्ये मोठा बदल झाला होता.
सासूबाई, ज्या पूर्वी आरतीला सतत टोचून बोलायच्या, आता तिची प्रशंसा करू लागल्या होत्या. त्या आता आरतीला आपली मुलगी मानू लागल्या होत्या, आणि आरतीलाही सासूबाईंकडे पाहून आईची छबी दिसू लागली.
सहावा महिना येताच आरतीने ठरवले की तिला सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही.
ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाली, “बाबा, मला त्या विषाचा परिणाम नष्ट करणारी औषधी द्या. आता मला माझ्या सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही. त्या खूप चांगल्या आहेत!”
वडील हसले आणि म्हणाले, “अगं, कसलं विष? मी तुला पचणाचं चूर्ण दिलं होतं!”
मुलींना योग्य मार्ग दाखवणे हे आई-वडिलांचे कर्तव्य
आहे.
No comments:
Post a Comment